तब्बल तेरा महिन्यांनंतर जहाजावरुन सुट्टी
मिळाली. घरी जायचे ह्या कल्पनेने प्रचंड उत्साह संचारला होता. आपला देश, आपले शहर, आपळे घर,
आपली माणसे परत नजरेस पडणार व पुन्हा एकदा आपण आपले होणार हया विचारांच्या
धुंवाधार पावसात तेरा महिन्यांचे सर्व परिश्रम पार धुवून गेले होते. मन टवटवीत ताजेतवाने
बनले होते. काही गोड आठवणींच्या स्पर्शाने हृदयास पालवी फुटली होती, पुन्हा एकदा मैत्रिणींच्या घोळक्यात स्वत:चा कृष्ण झालेला माझा मी मला दिसत होतो! ह्यावेळी बर्याच गोष्टी करायच्या, अनुभवायच्या ठरवल्या होत्या. तेरा महिन्यांच्या कॅडेट जीवनातील खडतर काळानंतर
आता चक्क विमानाचे पंख लावून, ढगांच्या रुपेरी पायघड्या ओलांडत,
चांदण्यांच्या मोगर्याच्या ढिगातून सुगंधीत होत घरी जायचे आणि आपुलकीच्या
माणसांच्या कौतुक मिश्रित नजरेतील आनंद पहायचा, असा तो अव्दितीय
क्षण काही तासांवर येऊन ठेपला होता.
कोच मधून उतरुन समोरच उभ्या ठाकलेल्या
चकचकीत अंगकांतीच्या जेट विमानाकडे प्रवाशांचे पाय वळले. मीही त्या भल्याथोरल्या जेट
विमानातील प्रवासी आहे ह्या विचाराने हृदय उचंबळून आले होते. हपापलेल्या नजरेने मी
ह्या उचभ्रू प्रवासातील अनोखे देखणेपण टिपून घेत होतो. सिमेंट - काँक्रीटच्या स्वच्छ प्रांगणात जेट विमान,
नव्हे डौलदार राजहंस उभा होता. इंधन भरणारे ट्रक, सामान भरणारे ट्रॅक्टर्स आणि वीज व इतर उपकरणांच्या ट्रॉलीज यांना आपल्या पंखाखाली
घेऊन, कोवळी उन्हे अंगावर घेत, विमान प्रवासाची
तयारी करीत होते.
लांबचा प्रवास व तोही विमानातला, तशात शेजारी जर कुणी सुंदर तरुणी येऊन बसली तर? वाहवा ऽ ऽ काय मजा येईल!
घरी गेल्यावर मित्रांना तिखट - मीठ लावून सांगायला
- भाप मारायला मिळेल! गुबगुबीत सीट,
सुमधूर संगीत, त्यात मनमोहक सेंटचा शेजारच्या सीटवरुन
येणारा गंध, मानेच्या हेलकाव्याने तिच्या भुरभुरणार्या रेशमी
केसांचा होणारा मोरपिशी स्पर्श - - - - - - गोड गोड कल्पनांच्या
शेकडो इंद्रधनुंच्या कमानीतून माझ्या मनाचे पाखरू आकाशात आधीच भरार्या घेऊ लागले!
‘‘उंच टाचेतील,
शिडशिडीत बांध्याच्या, टापटीप, निटनेटक्या, नवयौवनी, उजळ अंगकांतीला’’ मी माझे बोर्डींग कार्ड दाखविले व मागे घुटमळणारे माझे पाय बळेबळे खेचत विमानाच्या
शिडीला लावले! आणि तेवढ्यात माझ्या पूढील वयस्कर गृहस्थ अॅल्युमिनीयमच्या
पायर्याचा गडगडाट करत धडपडले.
आता विमानात चढायचा जिना ही काय धडपडण्याची
जागा झाली? अगदी
बेडकानेही मोर बनून ऐटीत चालण्याची ही जागा. आणि इथे हा म्हातारा सद्-गृहस्थ धडपडला!
मी त्याला तत्परतेने हात दिला, बोर्डींग-कार्डवाली
‘‘उंच टाचेतील, शिडशिडीत बांध्याची, टापटीप,
निटनेटकी, नवयौवनी, उजळ अंगकांती’’ सुध्दा सहाय्याला धावली. पूढच्या पायरीवर अर्धवटपणे टाकलेला पाय खालच्या
पायरीवर घसरल्याने, गेलेला तोल त्या म्हातार्याने सावरलाही होता,
पण तरीही त्या ‘‘उंच टाचेतील, शिडशिडीत बांध्याच्या,
टापटीप, निटनेटक्या, नवयौवनी,
उजळ अंगकांतीने’’ आपल्या नाजूक खांद्यावर त्या
थेरड्याला पेलल्यासारखे दाखवत, पायर्या चढायला मदत केली. इकडे
मात्र माझ्या अंगाचा तीळ पापड झाला ! ! कानशीलांचा निखारा फुलू
लागला होता ! ! !
आपण व पर्यायाने आपली विमानकंपनी प्रवाशांच्या
मदतीसाठी किती तत्पर आहे हे दाखवून देण्याचा मोका त्या ‘‘उंच टाचेतील, शिडशिडीत बांध्याच्या, टापटीप, निटनेटक्या, नवयौवनी,
उजळ अंगकांतीने’’ पुरेपूर उचलला होता! का त्या नवतरूण शिडशिडीत बांध्यावर हात टाकता यावा म्हणून धडपडण्याचे त्याने
नाटक केले?
‘‘Are you OK?’’, गोड गोड नाजूक आवाज.
असे आवाज निखार्यावर फुंकणीचे काम करतात!
‘‘OH! Yes, thank you’’, टायच्या गळफासात
रुतलेले म्हातार्याचे मुंडके उत्तरले. ‘‘शिडशिडीत बांध्याच्या, टापटीप, निटनेटक्या,
नवयौवनी, उजळ अंगकांतीच्या, उंच टाचा’’ मदतीचा कार्यक्रम आटपून खाली उतरतांना मंद, उत्तेजक सेटचा मोरपिसारा अंगावरून गेल्यासारखे वाटले!
असे गंध निखार्यावर पळी पळीने तेल ओतण्याचे
काम करतात!
पुन्हा एकवार अॅल्युमिनीयमच्या पायर्याचा
गडगडाट करत मलाही धडपडावेसे वाटले ! पुढे
चालत, मागे वळून वळून ‘थँक्यू’ म्हणणार्या त्या म्हातार्याला,
‘‘बाबारे आता तरी पडू नकोस!’’ अशी विनवणी करायचे
अगदी जिभेवर आले होते, तोच - -
- - - ‘‘Thank you, young man’’, म्हणत म्हातार्याने
त्याच्याबद्दलचे माझ्या मनातील
कडवट भाव पुसून टाकले.
खरं म्हणजे त्या नाजूक
खांद्यांना त्याने दिलेल्या ओझ्यामुळे म्हातारा माझ्या मनातून उतरला होता, पण आता तो-हून जर आभार मानतोय तर आपणही मनातील
अढी विसरुन जावी असे स्वत:ला बजावत, ‘‘Oh, That's OK’’, असे काहीसे मी म्हणूनही टाकले. तो धडपडला म्हणून मी त्याला मनातल्या मनात जख्खड
म्हाताराही बनवले होते, पण आता त्याने मागे वळून पाहील्यावर कळले
की तो म्हातारा नव्हता. त्याच्या रापलेल्या चेहर्यावरुन त्याने पन्नास पावसाळे,
नव्हे पन्नास उन्हाळे पाहिल्यासारखे वाटत होते. पण काही असो,
पहिले इंप्रेशन ते पहीले इंप्रेशन! मी त्याच्या
कपाळावर ‘‘म्हा ता रा’’ अशी अक्षरे गोंदवून मोकळा झालो!
‘‘Where you work?’’, हातातील
एअर बॅग सांभाळत पायरी चढता चढता त्याने प्रश्न फेकला. लोकांनी हा प्रश्न मला विचारावा
असे मला नेहमीच वाटते व मग मीही ऐटीत उत्तर देतो की मी मर्चंट नेव्ही मधे आहे म्हणून.
त्यानंतर लोकांनी, ‘‘रिअली?’’, ‘‘अरे वा ऽ’’, असे आदरार्थी, डोळ्यात
कौतूक साठवत म्हणावे आणि मग मी विनयाचे नाटक; अगदी पूर्ण तीन अंकी संगीत नाटक; चेहर्यावर चढवावे यात
मन अंतर्बाह्य कसे सुखावून जाते.
पण ह्या गृहस्थाची
माझ्याकडे पाठ असल्याने, त्याच्या चेहर्यावरील
आश्चर्य, त्याचा हुंकार, त्याच्या डोळ्यातील
कौतूक आणि आदर, यांचा आस्वाद मला घेता आला नाही! नाही म्हटले तरी अपेक्षा भंगाचा राग मनाला चाटून गेला!
‘‘Where are you going?’’, उरलेल्या पायर्या चढता चढता त्याच्या पाठीने मला प्रश्न केला.
काय एकेक माणसे असतात! विमान म्हणजे काय जागोजागी थांबत जाणारी बस वाटली? एवढ्या मोठ्या जेट विमानाने
जाणार्या प्रवाशाने असे मूर्खपणाचे प्रश्न करावेत? कधी नव्हे ते विमानात
बसायला मिळाले की असेच होते.
मीही त्याची खिल्ली उडवण्यासाठी, ‘‘Being direct flight, this must be stopping only at Bombay ! !’’, असे हसत हसत म्हणून
घेतले. बरे आपल्याला माहीत नसेल तर माणसाने जरा गप्प तरी बसावे! झाकली मुठ सव्वा लाखाची - एवढे तरी तारतम्य ठेवावे? आता मीही विमानप्रवासातील
पहीलटकरच होतो ! ! ! पण मी कसे, जहाजावरील
ऑफिसरांना खोदून खोदून विमानाच्या प्रवासाबद्दल माहीती विचारुन
घेतली होती. सुरवातीला हवाई-सुंदरी चॉकलेट वाटते, इथपासून ते अगदी टॉयलेटचा फ्लश कसा
वापरायचा इथपर्यंत सर्व कसे माझ्या अगदी तोंडपाठ झाले होते! घरी
जाऊन भाऊ-बहीण, मित्र-मैत्रिणी, यांना सांगण्याची
जय्यत तयारी केली होती म्हटले, तर चूक ठरणार नाही! जणू माझा जन्मच विमानात झाला, असे वाटावे इतकी घोकंपट्टी
झाली होती!
‘‘No, No, What I mean is, are you going to join a ship or going on leave?’’, बोलता
बोलता ओघळलेली कवळी घाईघाईने सावरावी तसे, म्हातार्याने भरकटलेल्या
शब्दांचे जहाज पुन्हा मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला.
‘‘Ya!, On leave, - - - After 13 month's hard work!’’, मीही माझ्या कर्तूत्वाचे
सार त्याच्या घशाखाली ओतले, पण त्याला अर्थबोध झाला का नाही हे
कळायला मार्ग नव्हता, कारण पाठीवरील शर्टाला पडलेल्या सुरकुत्यांच्या
हालचालींवरून दुसर्याच्या मनातील विचार मला ओळखता येत नाहीत!
पुढे दारात आलेल्या हवाई सुंदरींनी त्याचे
गोड गोड हसून मनापासून स्वागत केले, तर
ह्या भल्या गृहस्थाने आत शिरल्या-शिरल्या, घशाला कोरड पडल्याचे
जाहीर केले व प्यायला पाणी मागितले. झाले, थेरड्याचे शब्द विरण्याआधीच
खरोखरच सुंदर असलेल्या हवाई-सुंदरीने त्याला मागील बाजूकडील पडद्याआड नेले. ती त्याला
एकट्यालाच तृप्त करणार. ह्या विचाराने माझ्या अतृप्त नजरेत वाळवंट पसरले! मागे हेंदाळणार्या पडद्याकडे पारदर्शक नजरेने पहाण्याचा प्रयत्न करत असतानाच
- - -
‘‘Yes?’’, असा
आनंदापेक्षा त्रासिक भाव असलेला प्रश्न फेकत दुसरी हवाई-सुंदरी बळेबळे हसली. हसलेच
पाहीजे हा नियम असावा म्हणून हसली, अन्यथा तीने मला वेडावूनही
दाखवले असते असे वाटून गेले! बोर्डींग कार्डकडे बघत, माझी जागा कोणत्या भागात आहे ते हाताने दाखवत, ती मागच्या
दुसर्या प्रवाशांकडे वळती झाली.
लहान मुले आणि म्हातारे-कोतारे यांचेच
वाजवीपेक्षा जास्त लाड ह्या विमान-कंपन्या का करतात? तरुणांच्या वाट्यालाही स्वाभाविक सुंदरता सहजपणे
का येऊ नये? यांचे गोड मधूर हास्य अचानक कुठे लुप्त होते? काटेकोर नियमांचे संचलन
करत असल्यासारखे बत्तीस दात लिपस्टीकलेल्या ओठातुन तिष्ठत ठेवणे याला हास्य म्हणावे
कां? मन:पुर्वक केलेले स्मितहास्य चमचम करणार्या
मोत्यांच्या दातांपेक्षा डोळ्यात तरळून जाणार्या भावातून व्यक्त होते, असे ओरडुन सांगावेसे वाटले. का जहाजावर,
हवाई-सुंदरी व त्यांचे मधूर हास्य वगैरे वगैरेंवर अती विचार केल्याचाही
हा परीणाम असेल? ! काहीही असो!
आपुलकीची अपेक्षा आजच्या आपमतलबी आयुष्यात
अतीरंजीत असते.
मी माझी एअर बॅग वरच्या कप्यात कोंबुन, पटकन दोन खुर्च्यांमधे सरकत, मागील उतारूंना पुढे जायला वाट करून दिली. बोर्डींग-पास, विमानाचे तिकीट, कमरेला अडकवलेल्या पौचमधे नीट ठेवले,
सीटवर अस्ताव्यस्त पडलेला सेफ्टीबेल्ट बाजूला सारुन मी जागेवर बसलो.
शेजारील खिडकीजवळची जागा रिकामीच होती. आपापल्या जागा शोधत उतारू पुढेपुढे जात होते.
एक बर्यापैकी एकटेच पाखरु जागा शोधत शोघत माझ्यापर्यंत आले. माझ्या हृदयाचा एक ठोका
चुकवत, आपली इवलाली पर्स नाजूक हाताने सावरत, पुढे निघुनही गेले! तिला खिडकीची, शेजारची सीट आत्मियतेने देऊ लागलेल्या माझ्या मला मी पुन्हा माझ्या सिटवर खोचून
घेतले, प्रचंड नाराजीने!
मधल्या वाटेतून दोन जाडजूड एअरबॅगा खरडत
खरडत नेत, घामाघुम झालेला एक बिच्चारा
नवोदित नवरा, नुकत्याच आई झालेल्या आपल्या पत्नीच्या कडेवरील
कावलेल्या पोराकडे केविलवाणे हसत, जागांचे नंबर पहात पहात आला.
तान्हुल्याचे इवलाले डोळे भोवतालीचे अनोळखी जग पाहून भेदरले होते. त्याच्या डोळ्यांमागे
लपलेले व फुटायच्या बेतात आलेले खडकवासला धरण मला स्पष्ट दिसले! त्या बाळसेदार पोराला आपल्या रुदनास्त्रांचा रियाझ मनसोक्त करून घेण्यासाठी
अगदी थेट पुढची पायलट जवळची जागा मिळावी म्हणून मी कोटी-कोटी पंचमहाभूतांची काकूळतेने
करूणा भागली!
मुरलेल्या घामाचे वाफारे सोडत ते जोडपे
पुढे निघुनही गेले व मी माझ्याही नकळत दीर्घ उसासा सोडला. म्हातारे आणि बाल-बच्चे यांसाठी
वेगळी खास विमाने असायला हवीत असेही वाटून गेले! थेट विमानातील आपापल्या जागेपर्यंत सामान-सुमान पोचवणारे हमाल विमानतळावर का
मिळत नाहीत? रेल्वेकडून विमानसेवेने हे जरुर शिकून घ्यावे, असा प्रस्तावही
मी पास केला! जहाजावर विमानाविषयी माहीती शोधुन काढताना मला ह्याबद्दल
कोणीच कसे काही सांगितले नाही ?
वाक्या-वाक्यातून लाजत, पावला-पावलांनी ठुमकत, क्षणा-क्षणाला मुरकत, प्रसाधनांचे संपूर्ण डिपार्टमेंटल
स्टोअर अंगभर सांडवून घेतलेल्या चार तरूणींचा थवा, सुगंधाची खिरापत
वाटत आला. त्या कमनीय बांध्याच्या चारीच्या-चारी युवती माझ्या शेजारच्या एकाच सिटवर
गुण्यागोविंदाने बसू शकतील? मी उगाचच माझ्या मनाला विचारून पाहीले!
ही द्राक्षे आपली नव्हेत म्हणून मी आंबट तोंड करून घेतले! एक रांग सोडुन त्या स्थानापन्न झाल्या - - - नजरेच्या
टप्प्यात पण आवाक्यापासून दूर - - - जणू इंद्रधनुष्यच!
तोच माझ्या खांद्यावर टकटक करत ‘‘एस्क्यूज
मी’’ म्हणत, पांढरे शुभ्र दात विचकत,
तोच जख्खड म्हातारा, शेजारील खिडकी जवळची जागा
पटकविण्यासाठी तिष्ठत उभा असलेला दिसला.
नाही! नाही!! नाही!!! विमानातील सूरम्य
प्रवासातील माझ्या गोड-मधूर स्वप्नांचा असा कडेलोट पहाणे मला असह्य झाले! टारझन बनून त्या हिंस्त्रश्वापदावर झेप घेऊन त्याचा खातमा करून, गगनभेदी विजयी आरोळी ठोकावी असे वाटले! पोळपाट आणि लाटणे,
खल आणि बत्ता, उखळ आणि मुसळ, पाटा आणि वरवंटा अशी सगळी पांढरपेशी शस्त्रे माझ्या मनात एकवटून आली आणि मी
त्याला त्याची खिडकीजवळची सीट प्रदान केली ! !
गेले पंधरा-वीस दिवस विमानातील माझ्या
सीटच्या अवती भवती मोगरा, गुलाब,
चमेली, जाई, जुई,
वगैरे वगैरे सुंदर, नाजुक, सुवासिक फुले उमलत असत! माझ्या हळूवार मनावर त्या सुकोमल
फुलांचा सडा पडे! ढगांचे डोंगर चढता चढता विमान नागमोडी वळणे
घेई! व ह्या सुरम्य वेली माझ्या अंगाखांद्यावर आधारासाठी डोके
टेकत! जागेपणीही स्वप्नात खुटलेल्या फुलांची परडी मिरवत मी चालत
असे! विमान प्रवासाची कुंडली मी कशी इंद्रधनुच्या रेघात,
चांदण्यांनी मढवली होती! ती अशी धुक्यासारखी विरून
गेली तर कोणाला राग येणार नाही? !
"It was so hot outside.", आपल्या जागेवर आधी बसत मग बुडाखाली अडकलेले
सेफ्टीबेल्टस् खेचुन काढत महाभाग म्हणाला. त्याच्या घामाचा वास लवकर अदृष्य व्हावा
म्हणून मी थोडे उंच होत, डोक्यावरील एअर कन्डीशनचा झोत आमच्या
दोघांवर नीट अॅडजेस्ट केला. ‘‘Thanks’’, मैलभर
तोंड फाकत त्याने आभार मानले. विमानातील छोट्यामोठ्या गोष्टी आधीच माहीत करून घेतल्याचा
फायदा तर झाला! नाहीतर हा बसला असता, ‘Very hot . . Very hot ..’, अशी फुरफुर्या स्टो सारखी भुणभण लावत! अजून दरवाजे उघडे असल्यामुळे आत उकडत होते खरे. हे एवढे मोठे जड विमान पिसासारखे
हलके होत उडत जाणार व हां हां म्हणता मला आपल्या देशात नेऊन सोडणार, खरच वाटत नव्हते.
मोठ्या थोरल्या गरुड पक्षाच्या पोटात
बसल्यासारखं वाटत होतं. गरुड पक्षाचं पोट कस असतं? ! कसही का असे ना! पण विमानातील
आतला भाग कलात्मक व आटोपशीर होता. ग्रे रंगातल्या विविध छटात; छत, खिडक्या, पडदे, खुर्च्या,
गालीचा नटला होता. आपापल्या जागेत थोडीफार चुळबुळ करत प्रवासी स्थिरस्थावर
होत होते. त्या चार तरूणींचा थवा नाजुकपणे, इंग्रजीत कुजबुज करत
असतांना मधेच त्यातून ‘इश्शऽऽ’ अशी नाजूक किलबील, लाजरा निनाद,
नव्हे, कोवळ्या तारुण्याचा अंतर्मुख आवाज ऐकू आला! वाहवाऽऽ !
आपल्या पोरी-बाळींना इंग्रजीत कसं लाजायचं ते शिकवलं जात नाही ते बरं!
नाहीतर अशा अप्रतिम अविष्काराला अस्मादिक पारखे झाले असते! मोरपिसाने स्पर्श केल्यासारखा मी का सुखावलो कोण जाणे! अभावितपणे ‘‘झकास!’’ अशी दाद आपसूकपणे दिली गेली!
प्रतिक्षीप्त क्रिया का काय म्हणतात ते हेच असावे!
चार पोरी एकत्र आल्या की त्या साध्या-सुध्या, भोळ्या-भाबड्या रहात नाहीत! तो फार वेगळा मामला असतो! मीही कान मारूतीच्या शेपटीसारखे
लांब करत आणखी काही ऐकू येते का पाहू लागलो!
तोच ‘‘अरे! तू मराठी का?’’, शेजारच्या सीट मधली पिपाणी पिचकली! विलायती ‘‘Young man चे’’ मराठीकरण करुन त्याने मला हातोहात ‘अरे-तुरेचा’
मानाचा तुरा बहाल केला होता. पोरींच्या ‘‘इश्शऽऽ’’ मुळे अवघ्या जगतात जे काही घोटाळे
होतात त्यात आणखी एकाची भर पडली! मग मीही अस्सल मराठी माणसासारखा
चेहरा पाडून, हसत, मी जातीवंत मराठी असल्याची
त्याची सोळा आणे खात्री करुन दिली!
आता त्याने राजाभाई टॉवरची उंची किती?, भाऊच्या धक्याला कोणती
बस जाते?, चोरबाजारापासून
नळबाजार किती लांब आहे? वगैरे प्रश्नावलीच्या ऐवजी ‘‘तुम्हाला एफेल टॉवर
आवडला की टोकीओ टॉवर?, पनामा कॅनल व ग्रेट लेक्स यामधील मोठी लॉकगेटस्
कोणती?’’; असे उच्च पातळीवरचे प्रश्न
करावेत म्हणुन मी आपणहुन त्याला सांगितले, ‘‘मी राहतो मुंबईत
पण मर्चंट-नेव्हीमुळे देशोदेशी भटकावे लागते, आपण कुठे?.
. . ’’; मी त्याला म्हातारबुवा म्हणायचे सोडून उगाचच आदरार्थी
‘आपण’ का म्हटले? माझा मलाच राग आला. माझे बोलणे अर्धवट खोडून तो, ‘‘अच्छा
ऽऽ !?’’, असे ना धड कौतुक, ना धड
आदर, ना धड प्रश्नचिन्ह, असे काहीसे अलिप्तपणाने बोलला.
स्वत:च्या आयुष्यात काही जमले नाही की दूसर्याच्या कर्तेपणाला नाके
मुरडणार्या लोकांच्या गटातील तो असावा, असे वाटले. जाऊ दे, त्याला कशाला दोष द्यायचा? सेफ्टीबेल्टचे दुसरे
टोक तो शोधत होता. दोन खुर्च्यांमधे अडकलेले टोक त्याला त्याच्या जागेवरुन दिसत नव्हते,
मला माझ्या जागेवरून ते दिसत असल्याने, मी परत
त्याच्या मदतीला गेलो. टोक सोडवुन दिले, तसेच त्याला बेल्ट कसा
बांधायचा हे ही साग्रसंगीत समजावले. म्हातारा पहिल्यांदाच मनापासुन हसला. मीही माझे
वैमानिक -ज्ञान त्याच्यापुढे दाखवता आल्याने खुष झालो. अर्थात
त्याच्यासमोर सराईताचा अविर्भाव करत, चेहर्यावर अजिबात हास्य
आणले नाही. अशा वेळी माझ्यासारखी निर्विकार भूमिका करणारा मीच, अशी मी माझी पाठ थोपटून घेतली. कॉलेजमधील नाटकातून काही उगाचच बक्षीसे मिळाली
नव्हती!
विमानाचे दरवाजे बंद झाले. कुठचे तरी
इंजिन चालू झाल्याची जाणीव झाली. सर्वजण आपापल्या जागांवर बसले. कुजबुज बुजली. नजरा
खिडकीतून बाहेर डोकावू लागल्या. माझ्या सारख्या सराईताला, सदोदीत विमानाने प्रवास करणार्याला (!),
बाहेर बघण्यात काय इंटरेस्ट? ! म्हातारा मात्र काहीसे माझ्याकडे बघत,
मग बाहेर बघू लागला. मी त्याचे डोळे चुकवत, त्याला
कळणार नाही, अशा बेताने बाहेर डोकावून घेत होतो.
‘‘बॉबकटवाले मऊ मुलायम भुरभुरे केस, पातळ ओठांवरची ओलेती गुलाबी लिपस्टीक,
पुसट काजळाच्या महीरिपेतील टपोरे बोलके डोळे, सडपातळ
कमनीय आकारबद्ध बांधा’’, अशी ती, हसत हसत,
वाकत वाकत, चॉकलेट वाटत, पुढे पुढे येत होती. रंभा, अप्सरा यांच्या सानिध्यात
बिच्चार्या इंद्राचे काय होत असेल ते मला कळून चुकले!
काम कोणतेही असो पण ते तरुण मुलींनी
केले की त्या कामाच्या प्रत्येक अंगाअंगाला, कानाकोपर्यावर संगीत फुललेले दिसते. मग हलक्या फुलक्या काळजाला, स्वच्छंद बेफिकीर मनाला, सर्व जग नितांत सुंदर दिसु लागते
आणि प्रवासी हृदयाने हलु - डुलु - झुलु लागतो! चविष्ट
चॉकलेटच्या अशा सादर केलेल्या चवीने मन बर्याच गोष्टींचे रवंथ करत बसते!
मी बरीचशी चॉकलेटस् घेतली ती त्या कारणानेच! म्हातार्याने मात्र अरसिकतेने ‘‘No Thanks’’, म्हटले.
पापण्यांची बिच्चारी फडफड करत ती खट्टू झालेली दिसली. तिला पुन्हा हसताना पहावे म्हणून
मी काही चॉकलेटस् पुन्हा घेतली, आणि ती हसलीही! हा म्हातारा माझ्या जवळ नसता तर किती बरे झाले असते. रसिकता म्हणून नाही. भक्कड,
अक्कलशुन्य, मुर्ख, नालायक,
.. .. .. .. , मला आठवतील त्या सर्व समर्पक शब्दांचा लांबलचक हार,
नीटपणे गुंफुन त्याला प्रेमाने, मनातल्या मनात
वाहिला तेव्हा कुठे मला बरे वाटले!
जहाजावर सर्वांना एकलकोंडेपणा खूप सतावतो.
तीच ती डोकी, जरी एकमेकांशी पटत नसले,
तरी पुन्हा पुन्हा एकत्र येतात. नव्हे त्यांना त्याशिवाय दुसरा मार्ग
नसतो. भर समुद्रात, जहाजावर, मुली फक्त
स्वप्नात दिसतात! आणि आज तर प्रत्यक्षात नयनरम्य खुराक चालु होता.
काय पाहू आणि काय नको असे झाले होते. अशांत अतृप्त आत्मा अचानक अवनीवर अवतरला,
तर काय होईल? अशी काहीशी स्थिती होती!
आणि हा शेजारचा भावना रहीत ठोकळा पत्रके
- पेपर - मासिके उचकत होता.
आलीया भोगासी असे म्हणत, मग मीही त्या छापील पत्रकात असलेली ऑक्सीजन
मास्क, लाईफ-जॅकेटबद्दलची सर्व माहीती त्याला सविस्तर समजावून
सांगितली. लाईफ-जॅकेट पंक्चर झाले तर काय?, रात्रीच्या वेळी लाईफ-जॅकेट घातलेले पॅसिंजर
दिसून तरी येतील कां?, असे फालतू प्रश्न त्याने विचारले. खरं म्हणजे
फालतू अशासाठी की, त्यात मला त्याची म्हातारी, गचाळ नैराश्यजनक भुमिका दिसत होती आणि खरंखुरं नक्की उत्तर मला माहीत नव्हतं!
पण मीही त्याला लाईफ-जॅकेट पंक्चर होत नाही व विमानाला बाहेरच्या बाजूने
मोठे थोरले लाइटस् असतात असे अंदाजाने पण ठणकावून सांगितले. एखाद्या विद्यार्थ्याने
शिक्षकापुढे मान डोलवावी तसे त्याने ‘‘अच्छा अच्छा’’ म्हटले. इंटरेस्ट घेऊन एखादा विद्यार्थी
प्रश्न विचारत आहे किंवा गायनाच्या मैफिलीत श्रोते माना डोलावत आहेत हे पाहून शिक्षकाला
- गायकाला कसं कृतकृत्य झाल्याचं समाधान मिळतं तसं मला वाटलं.
त्याचं काय असतं, अशा घाबरट माणसाला धीर देणे अशावेळी महत्वाचे
असते. नाहीतर भर प्रवासात हा ‘‘मेलो मेलो’’ असे ओरडायला लागला तर? ! अशा म्हातार्यांचा
काहीही भरोसा नसतो .
हळू हळू चालत विमान धावपट्टीकडे जाऊ
लागलं. धोक्याच्या वेळी उपयोगात येणार्या गोष्टींची माहीती व प्रात्यक्षिके दाखवली
गेली. मी म्हातार्याला आधीच सांगितलेली माहीती खरी ठरल्याबद्दल मी समाधानाने मान डोलावली
व अभिमानाने त्याच्याकडे पाहिले. मी मुरलेला, पट्टीचा प्रवासी आहे याची त्याला खात्री पटली असावी! मी मनातल्या मनात स्वत:ला गुदगुल्या करून घेतल्या!
अखेर विमानाने सूसाट धावत, धावपट्टीवरून पाय उचलत, जमीन सोडली आणि आकाश पंखांवर पेलायला सुरवात केली. जडत्वाने भरलेल्या रटाळ
जीवनाचा कोश दूर सारुन अचानक मनाला फुलपाखरासारखे नाजूक रंगीत पंख फुटल्यासारखे वाटले.
फुलपाखरासारखेच नाचावे, बागडावे, पण काय
करणार सराईत प्रवाशाची भुमिका निभावणे आता मला भाग होते!
मला खिडकीला डोके टेकवून - - - आजपर्यंत केवळ कथा-कादंबर्यात वाचलेल्या
- - - दूरवर खाली जमिनीवर दिसणार्या काडेपेटीसारख्या इमारती
व पेन्सीली एवढ्या रेल्वे वगैरे वगैरे बघायचे होते. पण! हा पण
फार वाईट असतो! औत्सुक्याचा ज्वालामुखी, निराकार चेहर्यामागे लपवत मी माझे एकपात्री नाटक ‘‘विमानातील सराईत प्रवासी’’
पूढे चालू ठेवले. म्हातार्याला फसविण्यातील आनंदही कमी नव्हता!
अरसिक बेचव माणसाला सराईत थापा मारत
मी गुळगुळीत, सपक प्रवासही चविष्ट
बनवला होता. शेजारी जर कुणी बुध्दीमान व्यक्ती असेल तर उच्च पातळीवरच्या गप्पा बहरतात
पण ह्या म्हातार्यासारखी जर कंपनी मिळाली तर कमीतकमी, बंडला
मारून का होईना वेळ मारून न्यावी लागते. एकमात्र होते, ह्याला
आपले अ-ज्ञान माझ्यापुढे प्रकट करायला लाज वाटत नव्हती! त्याने
प्रश्न करावेत व मी उत्तर द्यावे हा प्रकार खूप वेळ लांबला. जेवण आल्यावरही कुठच्या
डबीत काय आहे, आटोपशीरपणे कसे जेवावे, हेही
त्याला दाखवले. राइटबंधुंपासून विमानाच्या इतिहासाची कशी सुरवात झाली इथ पासून ते रॉकेट
युगापर्यंत सर्व विषय मी सहजतेने हाताळले, ज्या ज्यावेळी जे जे
मला येत नसेल तेव्हा मधेच पाणी पीत, चॉकलेट खात, दुसर्या विषयाला अचानक पालवी फुटवत, मी वेळ मारुन नेली.
पोटभर जेवण झाल्यावर जशी श्रीखंड-पुरीही
नकोशी वाटते तसा मला मग बंडला मारण्याचाही कंटाळा आला. मग मी विमानातील नाविन्यपूर्ण
प्रेक्षणीय स्थळाला, म्हणजेच Toilet ला, आवर्जून भेट दिली. व्हॅक्यूम-मुळे फ्लश होते तरी कसे हे पाहण्यासाठी आधी मी
टॉयलेट पेपरचे लहान-मोठे गोळे करुन टाकले, मग नॉब दाबून फ्लश
होताना होणार्या घडामोडींचे बारकाईने निरीक्षण केले! एक ‘‘इमर्जन्सी
कॉल-बेल’’ सोडता बाकी सर्व क्रिया-प्रक्रियांची प्रात्यक्षिके सर्वांगांनी सफळ-संपुर्ण
यशस्वी करून सुखासमाधानात जागेवर परतलो. जहाजावर ‘शिकून’ घेतल्यापेक्षा ‘शी-उरकुन’
आल्यावर - ज्ञानसंपदेत विपूल भर पडल्याचे जाणवले!
मंद दिव्यांच्या प्रकाशात समोर थाटलेल्या
छोटेखानी पडद्यावर कोणतासा सिनेमा सुरु झाला होता. बर्याच मंडळींचे आपापल्या हेडफोनशी
झगडणे सुरू होते. व्हॉल्यूम-कंट्रोल, चॅनल-सिलेक्टर
व एका कानापासून दुसर्या कानापर्यंत हेडफोनचे पोचणे यांचा जम बसत नव्हता! सिनेमाकडे दूर्लक्ष करत, एकाच दुलईत गुरफटलेल्या आणि
डोळे मिटूनही जागे असलेल्या काही तरूण जोडप्यांचा हेवा करत-करत, मी जागेवर परतलो. शेजारचा म्हातारा खिडकीला डोके टेकून निपचीत पडला होता. वेफर्स
बरोबर चमचमीत गप्पा कुरतडत ‘‘इंद्रधनु’’चे सिनेमा पहाणे चालू होते. दोस्ती घडवुन आणण्याची,
कुठच्यातरी मुलीशी संवाद साधण्याची, ह्या अधांतरी
अवकाशात काहीच संधी चालून न आल्याने, खट्टू होऊन, माझ्या सीट मधे मी बराच वेळ तळमळत होतो. मुद्यामहुन
जाऊन ओळख काढणे म्हणजे आगाऊपणा ठरला असता. ह्या म्हातार्या ऐवजी कोणी मुलगी शेजारी
बसली असती तर! म्हातार्याच्या नावाने, खडे फोडणे, नाके मुरडणे, वेडावून
दाखवणे, दात विचकणे, तळपायाची आग मस्तकात
जाणे, दात-ओठ खाणे, बाह्या सरसावणे,
. . . . . . अशा क्रमाने शेवटी . . . . मुग गिळणे,
आवंढा गिळणे, . . . करत करत . . . . गुंगी येणे, डोळे
मिटणे व अखेरीस झोपी जाणे मी पसंत केले!
सदोदित माझ्या स्वप्नात थाटणारा रंभा, अप्सरा, मेनका,
उर्वशी यांचा इंद्रदरबार आज भरला नाही. स्वप्नातही मी त्या म्हातार्याला
माझे हवाई विज्ञान रंगवून सांगत होतो. एक हजार प्रवाशांनी भरलेले विमान एकाएकी हवेतच
नादुरूस्त झाले! ताबडतोब मला कळविण्यात आले! मी मदतीला उडत गेलो! त्या विमानाला माझ्या छोट्या विमानाने
खेचत नेऊ लागलो! वाटेत आयस्क्रीमच्या ढगात आमची विमाने अडकली!
प्रवाशांनी खूप खूप आयस्क्रीम खाल्ले! सूर्याची
कोवळी कोवळी उन्हे आल्यामुळे आयस्क्रीम वितळू लागले! त्याचा मिल्क-शेक
बनला! त्या वितळलेल्या गुलाबी गुलाबी आयस्क्रीममधे अंघोळीसाठी
त्या चार तरुणींचा थवा उतरला! सगळीकडे धुसर वातावरण असल्याने
त्यात त्या नेमक्या हरवल्या! शोधशोधुनही मला त्या दिसत नव्हत्या!
दिसले ते फक्त त्यांनी उतरवून ठेवलेल्या त्यांच्या कपड्यांचे वाळवण!
आकाशात इंद्रधनुच्या दोरीवर टांगलेले त्यांचे कपडे कधीही सुकू नयेत असे
वाटले! धुक्यात शोधशोधुन त्या जेव्हा सापडल्या तेव्हा त्यांनी
खुप रंगबिरंगी कपडे घातले होते! कपड्यांची अशी अवस्था का? तर म्हणे, कपडे वाळतांना त्याना इंद्रधनुचे रंग लागले! मला इंद्रधनुचा
खुप राग आला! अर्थातच तो राग, त्यांचे कपडे
वाळवुन त्यांना दिल्याबद्दल होता! मी दोन्ही विमाने वेगात नेऊन
इंद्रधनुवर आदळविली! इंद्रधनुच्या घसरगुंडीवरून ढग आणि विमाने
खाली घसरली! दोन्ही विमानांच्या बोटी बनून त्या दूधाच्या सागरात
तरंगु लागल्या! अचानक सोसाट्याचा वारा सुटला व दुधाच्या लाटांत
असलेल्या साईमुळे बोटीवरचे डेकस् बुळबुळीत झाले होते! ते साफ
करायला मला कुणीतरी हलवून हलवून उठवत होते ! !
मी जागा होत बघतो, तर हा म्हातारा मला हलवून जागा करत होता!
इतर प्रवासीही केव्हाचे जागे झाले होते. विमान झोकदार वळण घेत,
मुंबईच्या विमानतळावर उतरण्याची तयारी करत होते. एक ओळ सोडुन बसलेले
ते इंद्रधनु आपले विस्कटलेले रंग ठाकठीक करत होते! स्वप्नात नजरे
आड झालेला तो थवा पुन्हा नजरेसमोर दिसल्याने, हृदयातल्या काही
तारा पुन्हा एकदा झंकारल्या! मनाला परत लकाकी आली!
ढगांचे लोण्याचे गोळे कापत जाताना विमानाचे
पंख थरथरत होते. हळूहळू वेग कमी करत धावपट्टीकडे झेपावतांना विमानानेही आपला श्वास
रोखून धरल्यासारखे वाटले. आपल्या आयुष्याचे लगाम अक्षरश: पायलटच्या हातात असल्याचे
प्रकर्षाने जाणवले. थोडासा धक्का देत विमानाची चाके धावपट्टीला लागली. हवेच्या प्रचंड
झोत्याखाली थरथरत, वेग कमी होता होता, अखेर
गतीमान विमानाचे, सुरवंट झाले. विमानातील त्या चार फुलपाखरांनी
टाळ्या वाजवून, वैमानिकाचे अभिनंदन केले. मी ही टाळ्या वाजवुन
त्यांच्यात सामील झालो. अरसिक म्हातारा मात्र मख्खपणे बसला होता.
विमान थांबण्याआधीच प्रवासी सामान घेऊन
दरवाजाकडे झेपावले. थोड्याच वेळात दरवाजा उघडला गेला. म्हातारा गळ्याभोवतीचा टाय टापटीप
करत, छोटी एअर बॅग सांभाळत माझ्यापुढे हळुहळु चालत
होता. पुन्हा सामोर्या येणार्या अॅल्युमिनीयमच्या जिन्यावरून तो घसरणार नाही नां?, माझे मलाच हसु आले.
आता दमल्या-भागल्या हवाई-सुदरींचे निरोपाचे
केविलवाणे हास्य पाहून ह्याच सर्वसाधारण युवती विमानात शिरताना आपल्याला सुंदर का भासत
होत्या, याचेच आश्चर्य वाटले.
खरोखरीच्या विमानाच्या प्रवासापेक्षा त्या आधी 10 - 15 दिवस मी मनाशी रंगवत होतो ते विमान प्रवासाचे
स्वप्नच अधिक अद्भूत होते. अरे हो, नाही म्हटले तरी एका म्हातार्याला
मारलेल्या प्रचंड थापांचा अनमोल खजिना घरी फुशारक्या मारण्यासाठी मी नीट जपून बरोबर
घेतला होता!
विमानाचा कॅप्टन स्वत: दारात उभा होता. ‘‘बाय’’,
‘‘नमस्ते’’ असे प्रकार चालू होते. म्हातार्याला, ‘‘Thank you for being with us’’, व मला ‘‘Thank you’’, असे
म्हणाला. मी कॉलर ताठ करत, राजहंसाच्या चालीने जीना उतरू लागलो.
जणु एखादा मंत्री परदेशी दौर्यावरून परत आल्यावर उतरावा तसा किंवा सिनेमात दाखवतात
तसे अगदी एखाद्या हिरोच्या थाटात, मी उतरु लागलो! माझी मलाच गंमत वाटत होती. माझ्यापुढे उतरणार्या त्या म्हातार्या बेडकाचाही
मोर झाला होता! तोही अगदी थाटात चालला होता. मी काही त्याला दोष
दिला नाही. विमानांच्या शिड्यांचाच तो गुणधर्म असावा की ज्यामुळे त्यावर चालणारा प्रत्येक
जण डौलदार दिसू लागतो. शेवटची पायरी उतरून मी भारताच्या भुमीला स्पर्श केला आणि .
. . . . . .
स्वच्छ पांढर्या, एअर फोर्सच्या पोशाखात समोर उभे असलेले ऑफिसर
मला ताड्-ताड् सॅल्यूट करताना दिसले. मागे पांढर्याशुभ्र जीपचा ताफा उभा होता. अनामिक
भितीने माझे काळीज चरचरले. कोणताही गुन्हा केलेला मला आठवत नव्हता! तेव्हढ्यात माझ्यापुढील तोच ‘‘म्हा - ता – रा’’ त्या सॅल्युटचा सहजतेने स्वीकार करताना दिसला.
म्हणजे हा एअर-फोर्स मधे? माझ्या पायाखालची जमीन
जणु काही मला गिळंकृत करीत आहे असे वाटले. माझ्या नजरेसमोर जे घडत होते त्यावर विश्वास
ठेवायला माझे मन धजावत नव्हते. हा हरामखोर म्हातारा, एअर-फोर्सचा
कुणी मोठा अधिकारी? आणि मी त्याचे हवाई शिक्षणाचे पाठ घेत होतो!
ह्या म्हातार्याला काडीचीही अक्कल नाही असे ठरवत होतो! आणि हा थेरडा संपूर्ण विमान प्रवासात माझी टर उडवत, स्वत:ची मजा करून घेत होता! माझ्या अंगाची लाही लाही झाली. प्रवासातील आमच्या
संभाषणातील बर्याच अनुत्तरीत प्रश्नांचा चटकन उलगडा झाल्याचा साक्षात्कार झाला!
तळपायाची आग मस्तकात गेली! मी किती मुर्ख हे,
माझे मला, काहीही शब्द न वापरता, त्याने पटवून द्यावे? धायमुकलुन ढसाढसा रडावेसेही वाटले. मी संपूर्ण
पराजीत मनाने खंगुन, मान खाली घालुन, त्याला
टाळत, चालण्याची दिशा बदलत, पायांना गती
दिली. म्हातार्याने ते पाहीले. त्याच्या आगमनाच्या सत्कारातही, मुद्याम मागे वळून, माझ्या खांद्यांवर
थोपटल्यासारखे करत, . . ‘‘Hi! Sea cadet! Next time take care!’’, म्हणत हसला. अगदी विजयी
हसला.
धरतीमातेने उभ्या उभ्या मला पोटात घ्यावे
असे वाटू लागले. इतका पराजीत मी आयुष्यात कधीही झालो नव्हतो! पाणउतारा झालेले माझे हृदय गलबलून रडत होते.
हुंदके दाबत, मागे वळुनही न बघता, चालत
राहीलो!
मला माझा पहीला-वहीला विमानाचा प्रवास
संपूर्ण विसरायचा आहे! कधी शक्य होईल?